सुखामागे धावता धावता!
Posted On Tuesday, August 5, 2008 at at 11:04 PM by Patसुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहुनही माशाची मग भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खुप
वाटी - वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तुप
बायका आणि पोरांसाठी चले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागु नका वेळ
करीअर होतं जीवन, मात्र जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती, पैसा छापायचं यंत्र
चुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वत:च्याच घरी
दोन दिवस कौतुक होतं, नंतर डोकेदुखी सारी
मुलंच मग विचारु लागतात, बाबा अजुन का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी.
क्षणिक औदासिन्य येतं, मात्र पुन्हा सुरु होतं चक्र
करीअर - करीअर दळण दळता, स्वास्थ्य होतं वक्र
सोनेरी वेली वाढत जातात, घराभोवती चढलेल्या
आतुन मात्र मातीच्या भिंती, कधीही न सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवु लागतं काही
धवण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहुन गेलं
सुखाची तहान भागता भागता समाधान दुर वाहुन गेलं...!
Please comment if you like this post!
An AwaazBandh Presentation!